भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील इराणी मोहल्ला परिसरात लपवून ठेवलेल्या चोरीच्या तीन दुचाकी वाहनांचा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे २ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा संशयीत आरोपी फरार आहे.

६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवि नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक इराणी मोहल्ला, रजा टॉवर परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी एका घराच्या आडोशाला संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या तीन मोटारसायकली आढळून आल्या. संबंधित वाहनांच्या मालकांचा शोध घेतला असता कोणीही समोर आले नाही.
यानंतर पोलिसांनी तीनही दुचाकी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या चेसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान या तिन्ही मोटारसायकली मुक्ताईनगर, चोपडा शहर व तोफखाना (अहिल्यानगर) पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यांतील असल्याचे निष्पन्न झाले.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये पल्सर (एमएच-१९-ईएस-३५५५), पल्सर एन-१६० (एमएच-१९-ईटी-३३८०) तसेच केटीएम ड्यूक २५० (एमएच-१६-डीटी-७४३३) या दुचाकींचा समावेश आहे.
या प्रकरणात हसनअली उर्फ आशु नियाजअली इराणी (रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) या संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा संशयीत आरोपी सलमानअली हुजूरअली इराणी हा फरार आहे. दोघांनी मिळून या दुचाकी चोरी करून त्या लपवून ठेवल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पीएसआय रवि नरवाडे, पोलीस कर्मचारी गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच बाजारपेठ गुन्हे शाखेचे भूषण चौधरी, योगेश माळी, प्रशांत सोनार आदींनी सहभाग घेतला.
दरम्यान, जप्त केलेल्या दुचाकींचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.


