भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते धनबाद दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाडी सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या सेवेचा शुभारंभ एप्रिल २०२६ पासून होत असून, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड व झारखंड या राज्यांतील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

गाडी क्रमांक 13380 ही एक्सप्रेस ८ एप्रिल २०२६ पासून दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी १६:५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता धनबाद येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने, गाडी क्रमांक 13379 ही सेवा ६ एप्रिल २०२६ पासून दर सोमवारी धनबाद येथून रात्री २३:०० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी १३:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येईल.
या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी साऊथ, सिंगरौली, रेनूकूट, डाल्टनगंज, लतेहार, रांची रोड, चंद्रपूरा, कत्रासगढ आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
गाडीची रचना प्रवाशांच्या विविध गरजा लक्षात घेऊन करण्यात आली असून, त्यामध्ये २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ६ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान श्रेणी, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ जनरेटर डबे यांचा समावेश आहे.
या गाडीच्या (13380) आरक्षणाची सुविधा ५ एप्रिल २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTCच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. प्रवासी ‘RailOne’ ॲपद्वारेही तिकीट बुक करू शकतात. गाडीच्या सविस्तर वेळापत्रकासाठी रेल्वेच्या अधिकृत enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला किंवा NTES ॲपला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन साप्ताहिक एक्सप्रेसमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.


