महिलांनी सर्वक्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे -सौ रजनी सावकारे


जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ येथे महिलांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात

भुसावळ (प्रतिनिधी):
जागतिक महिला दिनानिमित्त सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (CRMS) भुसावळ यांच्या वतीने महिलांसाठी विशेष मनोरंजन व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत समाजाच्या सर्व क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करावे, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा सौ. रजनी सावकारे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. रजनी सावकारे, निरंजना तायडे, अॅड. प्रिया अडकमोल तसेच नगरसेविका प्राची पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी सौ. रजनी सावकारे यांनी आजच्या समाजात महिलांचे स्थान, त्यांच्या कर्तृत्वकथा आणि महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत समाजातील सर्व क्षेत्रात आपली ओळख निर्माण करावी, असेही त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमात महिलांच्या कलागुणांना व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम आणि सादरीकरणे आयोजित करण्यात आली होती. महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सुरेल गाणी, आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणांमुळे कार्यक्रमात उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरण निर्माण झाले.

यावेळी निरंजना तायडे, अॅड. प्रिया अडकमोल आणि नगरसेविका प्राची पाटील यांनीही महिलांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे उपस्थित महिलांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून आले.

कार्यक्रमात कलागुण सादर करणाऱ्या सर्व महिलांना प्रमुख पाहुण्या सौ. रजनी सावकारे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी CRMS च्या महिला प्रतिनिधी सौ. आरती चौधरी तसेच भुसावळ विभागातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.