भुसावळ (प्रतिनिधी):
आई-वडील आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने चालणाऱ्या व्यक्तींना तीर्थयात्रेचे पुण्य लाभते. त्यामुळे जीवनात सदैव त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन आचार्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी केले.

शिव महापुराण कथेदरम्यान उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मानवाचे जीवन क्षणभंगुर असून कितीही जन्म घेतले तरी परमपिता शिवाला पूर्णपणे ओळखणे शक्य नाही. मात्र शिवाची कृपा प्राप्त होण्यासाठी दररोज शिवपिंडीवर एक लोटा जल अर्पण करावे तसेच शंकराचे भजन-कीर्तन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
आजचा काळ हा ‘ओटीपी’चा काळ आहे. बँकेचे व्यवहार असोत किंवा इतर कामे, प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलवर ओटीपी येतो. त्याचप्रमाणे “श्री शिवाय नमस्तुभ्यम्” हा मंत्र शिवभक्तीसाठी ओटीपीसारखा असून तो भक्तीचे द्वार उघडतो, असे त्यांनी उदाहरण देत सांगितले.
मानवाला जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध परीक्षा द्याव्या लागतात. जगात जिवंत असताना माणसाची विचारपूस केली जात नाही; मात्र त्याच्या निधनानंतरच लोक त्याची आठवण काढतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आजच्या काळात माता-भगिनींची प्रसूती बहुतांश ऑपरेशनद्वारे होत असून मोबाईल व टीव्हीवरील मालिकांमध्ये तरुण पिढी गुंतली आहे. पूर्वी महिलांनी घरातील अनेक कामे करत सक्रिय जीवन जगले, त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता चांगली होती. आज मात्र जीवनशैली बदलल्याने अनेक समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी मुले आजी-आजोबांच्या सहवासात वाढत असल्याने त्यांच्यावर संस्कार होत होते. मात्र आज पालक मुलांची अति काळजी घेत असल्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी सनातन धर्माचे महत्त्वही स्पष्ट केले. मुलींनी शिक्षण घ्यावे, प्रगती करावी, मित्र-मैत्रिणी कराव्यात; मात्र आपल्या धर्माविषयी अभिमान ठेवावा आणि आई-वडिलांच्या संमतीनेच विवाह करावा, असा संदेश त्यांनी दिला. तसेच मुलांनीही सनातन धर्मातील मुलीशीच विवाह करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
शिवमंदिरात जल अर्पण करताना आपल्या दुःख-वेदना आणि मनोकामना शिवाला सांगाव्यात. शिव म्हणजेच आपले पिता असून त्यांच्या कृपेने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, असे त्यांनी सांगितले.
शिवमहापुराण कथेत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यामागील कारण म्हणजे या कथा मंडपात महादेवांचे ‘मजबूत नेटवर्क’ मिळते, असा उल्लेख करत त्यांनी भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
सोन्याचे दागिने, बिस्किटातील फरक
सुनेला चार तोळे सोने देणे व चार तोळे बिस्किट देणे यात फरक आहे. चार तोळ्याच्या सोन्याचे बिस्किट नजरेत बसत नाही. मात्र, तितक्याच चार तोळ्याचे दागिने दिले तर ते नजरेस बसते. दोन्ही एकसारखे म्हणजे चार तोळे वजनाचे आनजरेत बसत नाही. मात्र, तितक्याच चार तोळ्याचे दागिने दिले तर ते नजरेस बसते. दोन्ही एकसारखे म्हणजे चार तोळे वजनाचे आहेत.मात्र बिस्किट दिसत नाही, दागिने दिसतात. कारण दागिने बनवण्यासाठी वेळ लागतो, सोन्याला अग्निपरीक्षा वा टाक्याचे घाव सहन करावे लागतात. त्याचप्रमाणे एक साधारण व्यक्ती व शिवभक्ताची किमत वेगळी असते, असे पं. मिश्रा म्हणाले.
शिवमहापुराण कथेत शनिवारी पाचव्या दिवशी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रावेरचे आमदार अमोल जावळे, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, नगरसेवक पिंटू कोठारी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. यावेळी भाविकांनी आपल्या जागेवर बसून महाआरती केली.
दरम्यान, यावर्षी सीहोर येथे 15 मार्च 2026 पासून पुढील एक वर्ष ‘रुद्राक्ष महोत्सव’ अंतर्गत रुद्राक्ष वाटप करण्यात येणार असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या 10 मार्चपासून सुरू असलेल्या शिव महापुराण कथेला 16 मार्च रोजी समारोप होणार आहे. दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत कथा होत असून समारोपाच्या दिवशी सकाळी 8 ते 11 या वेळेत कथा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


