चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील राखुंडे नगर परिसरात धक्कादायक चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिच्या गळ्यातील सुमारे १ लाख २० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत (मिनी माळ) हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ता प्रतीक पाटील (वय २६, रा. राखुंडे नगर, मालेगाव रोड, चाळीसगाव) या शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरासमोर उभ्या होत्या. त्याच वेळी अज्ञात मोटारसायकलस्वार अचानक त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर मिरचीची पूड फेकली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्या काही क्षण गोंधळल्या असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसकावून घेतली आणि मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेत चोरीस गेलेल्या दागिन्याची किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर प्राजक्ता पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करत आहेत. दरम्यान, रात्रीच्या सुमारास झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


