भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ नगरपालिका सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने नगराध्यक्षांनी सभा तहकूब करण्याची घोषणा केली. ही तहकूब सभा आता मंगळवारी दुपारी चार वाजता घेण्यात येणार आहे.

शुक्रवारी दुपारी चार वाजता नगरपालिका सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच काही नगरसेवकांनी रमजान आणि शिवपुराण कथेमुळे सभेची वेळ गैरसोयीची असल्याचे सांगत पुढील सभा सकाळच्या वेळी घेण्याची सूचना केली.
दरम्यान, भाजपा गटनेते युवराज लोणारी यांनी मागील सभेचे कार्यवृत्त (प्रोसीडिंग) उपलब्ध नसल्याबाबत विचारणा करत नगराध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन चर्चा सुरू केली. यावर सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी आक्षेप घेत सदस्यांनी आपल्या जागेवरूनच बोलावे असे सांगितले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली आणि गोंधळ वाढत गेला.
गदारोळ वाढताच नगराध्यक्षांनी सभा तहकूब झाल्याची घोषणा करून सभागृह सोडले. त्यानंतर सत्ताधारी नगरसेवकही बाहेर पडले. मात्र भाजपा नगरसेवक सभागृहातच थांबून त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “दादागिरी चालू देणार नाही” अशा घोषणा देत त्यांनी रोष व्यक्त केला.
या वेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, गटनेते सचिन चौधरी आदी उपस्थित होते.
दरम्यान, सभेच्या अजेंड्यावर तब्बल ३४१ विषय आहेत. यात शहरातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा सुरू करणे, पालिकेच्या इमारतीवर नाट्यगृह उभारणे, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसाठी नवीन स्कॉर्पिओ वाहन खरेदी, शहरातील पुतळ्यांवर सीसीटीव्ही बसवणे, पाणीटंचाईवर उपाययोजना, वातानुकूलित सार्वजनिक शौचालये उभारणे तसेच शहराच्या प्रवेशद्वारांची उभारणी यांसारखे विविध विकासात्मक विषयांचा समावेश आहे.
मंगळवारी होणाऱ्या पुढील सभेकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


