भुसावळ तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित; नागरिकांची महत्त्वाची कामे ठप्प :

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ शहरातील प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भुसावळ शहरातील तलाठी कार्यालयाचे तब्बल ४२ हजार ५६० रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे महावितरणने कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ पासून तलाठी कार्यालयाचे वीज बिल थकीत होते. संबंधित विभागाला वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र थकीत रक्कम न भरल्याने अखेर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात आली.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तलाठी कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर थेट परिणाम झाला आहे. विविध दाखले, नोंदी तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची कामे ठप्प झाली असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कार्यालयात वीज नसल्याने संगणकीय कामकाज पूर्णपणे बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून त्यांची पायपीट वाढली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.