८४ लाख योनीनंतर मिळालेला मनुष्य जन्म सत्कर्मानेच सार्थ करा”– पंडित प्रदीप मिश्रा यांचे भुसावळ येथे मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी ) : “मनुष्य जन्म हा ८४ लाख योनींनंतर मिळतो. त्यामुळे या जन्मात देवाधिदेव भगवान शिवाची भक्ती करून सत्कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. शिवभक्तीमुळे माणसाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते आणि जीवनाचे खरे सार्थक होते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी भुसावळ येथे केले.

भुसावळ शहरातील तापी नदीच्या पवित्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या भव्य शिवमहापुराण कथेमध्ये चौथ्या दिवशी हजारो भाविकांना संबोधित करताना ते बोलत होते. प्रचंड उष्णतेचे वातावरण असूनही सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी कथा स्थळी होत असल्याचे पाहायला मिळाले.

आपल्या प्रवचनात पंडित मिश्रा यांनी सांगितले की, ८४ लाख योनींपैकी केवळ मानव योनीतच परमेश्वराने समजण्याची व विचार करण्याची शक्ती दिली आहे. त्यामुळे मानवाने आपल्या जीवनाचा योग्य उपयोग करून सत्कर्म करावे आणि शिवभक्तीच्या माध्यमातून जीवन पवित्र करावे.

वाढत्या घटस्फोटांबाबत चिंता

समाजात वाढत चाललेल्या घटस्फोटांच्या घटनांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. आजच्या तरुण पिढीत लग्नानंतर काही दिवसांतच घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. “आज लग्न होते आणि काही दिवसांतच पती-पत्नी वेगळे होतात, मग त्या नात्यातील प्रेम कुठे आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सनातन धर्मात पती-पत्नीचा संबंध हा सात जन्मांचा मानला जातो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांशी सुसंवाद आणि निष्ठा ठेवण्याची परंपरा या संस्कृतीत आहे. त्यामुळे कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी परस्पर समजूत आणि श्रद्धा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवभक्तीमुळे नातेसंबंध अधिक दृढ

तरुण-तरुणींना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, जर आयुष्यात शिवाची आराधना करणारा जोडीदार मिळाला तर ते मोठे भाग्य समजावे. शिवभक्तीमुळे मनात शांतता आणि समजूत वाढते, त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होतात.

पालकांना उद्देशून त्यांनी आवाहन केले की, आपल्या मुलांना आणि मुलींना मंदिरात जाऊन शिवलिंगावर एक लोटा जल अर्पण करण्याची सवय लावावी. आजच्या धावपळीच्या जीवनात थोडा वेळ देवासाठी दिला, तर जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

अहंकाराचा त्याग करा

कथा ऐकताना केवळ श्रवण न करता त्यातील संदेश आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “शिवभक्ती करताना प्रत्येकाने अहंकाराचा त्याग केला पाहिजे. मन शुद्ध ठेवून सत्संग आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारला तर जीवनात खरे समाधान मिळते,” असे त्यांनी सांगितले.

शेवटच्या क्षणी साथ देतात पुण्यकर्म

माणसाच्या शेवटच्या क्षणी पैसा किंवा संपत्ती उपयोगी पडत नाही, त्या वेळी आयुष्यात केलेली पुण्यकर्मच साथ देतात, असे सांगत त्यांनी भाविकांना आयुष्यात जास्तीत जास्त पुण्य कमवण्याचे आवाहन केले.

भाविकांची मोठी गर्दी

शिवमहापुराण कथेच्या चौथ्या दिवशी प्रचंड उष्णतेच्या वातावरणातही सकाळी दहा वाजल्यापासून भाविकांचे जथ्थे कथा स्थळी दाखल होत होते. दुपारी एकपर्यंत भव्य सभा मंडप जवळपास पूर्ण भरला होता. शनिवार व रविवार शासकीय सुट्टी असल्याने पुढील दिवसांत भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नियोजनाची चोख व्यवस्था

सात दिवस चालणाऱ्या या शिवमहापुराण कथेसाठी आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे. लाखो भाविक उपस्थित असूनही सर्व व्यवस्था सुरळीत सुरू आहे. भाविकांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजन सेवा तसेच अन्य सुविधा व्यवस्थितपणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शिरपूर येथील शंभू इव्हेंट यांच्याकडे सोपविण्यात आली असून चेतन चौधरी स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवत आहेत. भव्य दिव्य मंडपात भाविक मोठ्या भक्तिभावाने शिवमहापुराण कथा ऐकत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला आहे.