भुसावळ (प्रतिनिधी ) – जामनेर जाणाऱ्या रस्त्यावर आयशर वाहनाला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास घडली. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी या आगीत वाहनातील साहित्य जळून नुकसान झाले तर चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने प्राणहानी टळली. दरम्यान, या वाहनात ऑक्सीजन सिलिंडरसह सल्फ्यूरिक अॅसीड असल्याने स्फोट होण्याची शक्यता गृहीत धरून दोन्ही बाजूकडील वाहतूक काही वेळेसाठी थांबवण्यात आली होती

. …वाहनाला लागली आग
आयशर क्रमांक एम.एच.20 ईएल 8464 ही प्रवासात असताना जामनेर रोडवरील हॉटेल राजगडच्या समोर वाहनातील वस्तूंना आग लागल्याने चालक उमेश रमेश जाधव (हतनूर, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) याने वाहनातून उडी घेत जीव वाचवला तर भुसावळ तालुका पोलिसांना माहिती कळताच पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. भुसावळ पालिका व लगतच्या कंपन्यांच्या बंबांनी आग विझवली. या आगीत इंडस्ट्रीज मटेरियल, सिलेंडर, इतर उद्योग वस्तूंचे जळाल्याने नुकसान झाले. ट्रान्सपोर्टचे सुपरवायझर अरविंद उत्तम खंडारे यांनी भेट देत पाहणी केली.


