भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगावातील चालकाचा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे आल्यानंतर सोबतच्या मित्रांनी जेवताना झालेल्या वादानंतर धारदार शस्त्र मारून हत्या केली होती. या प्रकरणी तीन्ही आरोपींना शहर पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे.

जितेंद्र राजेंद्र साळुंखे (40, के.सी.पार्क, जळगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे तर खून प्रकरणी जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (क्रांती चौक, शिवाजी नगर, जळगाव), मयूर दीपक अलोने (बारसे कॉलनी, शिवाजी नगर, जळगाव) यांना जळगाव गुन्हे शाखेने तर दीपक वसंत शंकपाळ (कंडारी, ता.भुसावळ) यास शहर पोलिसांनी अटक केली.
कंडारी येथील दीपक शंकपाळकडे मयत जितेंद्रसह बाबू व मयूर रविवार, 5 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास आले होते. जेवत असताना उभयंतांमध्ये काहीतरी वाद झाला व तत्पूर्वी एका हॉटेलातही मद्यपानादरम्यान झालेल्या वादानंतर उफाळलेल्या वादानंतर शाब्दीक वाद गुद्यावर पोहोचला. यावेळी तिघा आरोपींनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने वार केले9
जखमी अवस्थेत जितेंद्रला तातडीने भुसावळातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मोहिम सुरू केली.
दोघांना जळगावात तर एकाला भुसावळात बेड्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार सलीम तडवी, रतनहरी गीते, सिद्धेश्वर डापकर, मयूर निकम यांनी बाबू सपकाळे व मयूर अलोनेच्या मुसक्या आवळल्या तर भुसावळ शहर पोलिसांनी दीपक शंकपाळला सोमवारी पहाटे अटक केली. मयताची पत्नी ज्योती साळुंखेच्या फिर्यादीवरून तीन्ही आरोपींविरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, आरोपींना भुसावळ न्यायलयात हजर केले असता 9 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत व पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
