मित्राला व्हिडिओ कॉल करीत भुसावळातील तरुणाची तापी पात्रात उडी : पोहणार्‍यांकडून तरुणाचा शोध –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील शनि मंदिर वॉर्डातील रहिवासी असलेला अक्षय निलेश चौधरी (18) या युवकाने मित्राला व्हीडीओ कॉल करून मी तापी नदीच्या पूलावरून उडी मारत असल्याचे सांगत पुलावरून उडी मारली. ही घटना बुधवारी सकाळी 9.30 ते 9.50 वाजेच्या सुमारास घडली. पाण्यात बेपत्ता अक्षय याचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसात मात्र या प्रकरणी नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरातील शनि मंदिर वॉर्डातील रहिवासी असलेला अक्षय चौधरी याने काहीतरी कारणातून तापी नदीच्या पुलावर पायी येत त्याने तेथून त्याच्या मित्र विजय बोदडे याला व्हिडीओ कॉल केला व मी नदीत उडी मारत आहे, असे सांगून ोबाईल बंद केला. अक्षयने पुलावर मोबाईल ठेवत तेथेच चप्पल काढली व पूलावरून येणार्‍या जाणार्‍यांच्या समोर नदीत उडी मारली. अक्षयने नदीत उडी मारल्याची माहिती मिळताच पूलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. हतनूर धरणाचे दरवाजे उघडे असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर नदी पात्रात होत आहे. यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह अधिीक आहे. अक्षय याने उडी मारल्यावर तो पाण्यासोबत वाहून गेला.

पोलिसांची धाव : तरुणाचा कसून शोध
भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार युनुस शेख, शेखर तडवी यांनी तापी नदीवर जाऊन तेथे पोहणार्‍यांशी संपर्क साधला. यावेळी पोलिसांनी भानखेडा व शेळगाव येथील पोलिस पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही माहिती दिली आहे.

मित्राशी बोलतांना आले रडू
अक्षय हा बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास तापी नदीच्या पूलावर आला. यावेळी त्याने त्याचा बोदवडला आयटीआय करीत असतांना मित्र विजय बोदडे (कंडारी) याला फोन करीत तापी पात्रात उडी घेत असल्याचे सांगून फोन कट केला.