हातात कोयते अन तलवारी घेऊन टोळक्याची दहशत 12-15 जणांच्या टोळीचा थरार सीसीटीव्हीत कैद;

पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे सावट पसरले आहे. रविवारी सकाळी लक्ष्मीनगर भागात तब्बल १० ते १२ जणांच्या टोळक्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. येरवडा परिसरात या टोळक्याने दुचाकीवरून येत हातात कोयते, तलवारी आणि काठ्या घेऊन रस्त्यावर धुमाकूळ घातला. यानंतर आरडा-ओरडा करत, धमक्या देत आणि वाहनांची तोडफोड केली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.

या व्हिडीओत एक मुलगा त्याच्या घराजवळ उभा असल्याचे दिसत आहे. यानंतर त्याचवेळी १० ते १२ जणांची टोळी दुचाकीवरुन परिसरात फिरताना दिसत आहे. या सर्वांच्या हातात कोयते, तलवारी अशी धारदार शस्त्र पाहायला मिळत आहे. ती शस्त्र घाबरलेल्या नागरिकांनी भीतीपोटी घराचे दरवाजे बंद करून स्वतःचा जीव वाचवत असल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांनुसार गेल्या काही दिवसांपासून हे टोळके परिसरात दहशत निर्माण करत आहे. रात्री उशिरा फिरून धमक्या देणे आणि विरोध करणाऱ्यांवर शस्त्रांनी हल्ला करणे हे त्यांचे नेहमीचे झाले आहे, असा आरोप केला जात आहे.

याच दरम्यान, लक्ष्मीनगर परिसरात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी जहुर शेख, सुलतान खान, आझाद खान आणि मुस्तफा खान यांनी एका घरात घुसून महिला व तिच्या मुलावर तलवारीने वार केले. तसेच त्यांना धमकी दिली. माझ्या आईला का मारले? असे ओरड आरोपी घरात घुसले. यावेळी त्यांनी महिलेला शिवीगाळ करत मेरे पेर पड असे म्हणण्यास भाग पाडले व धमक्या दिल्या. या हल्ल्यात महिला व तिचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनांची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखा युनिट-४ आणि स्थानिक गस्ती पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी जमाव पांगवला आणि काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, काही मुख्य आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. येरवड्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत झाले असून त्यांनी पोलिस आयुक्तांकडे मोक्का सारख्या कठोर कायद्यांतर्गत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. परिसरातील वाढती गुन्हेगारी आता पोलिस प्रशासनासाठी एक गंभीर आव्हान ठरत आहे. तसेच नागरिकांकडून पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. यानुसार कठोर कारवाईची मागणी केली आहे.