तारीख पे तारीख ; शिवसेना कुणाची ? 12 नोव्हेंबरला होणार सुनावणी –

मुंबई : शिवसेना व पक्ष चिन्ह कुणाचे याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंंबित असलेल्या याचिकेवर मंगळवार, 8 रोजी निकाल समोर येण्याची शक्यता होती मात्र ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतल्याने

आता सर्वोच्च न्यायालयात 12 नोव्हेंबरला याप्रकरणाची पुढील सुनावणी आहे. या खटल्याबाबत तारीख पे तारीख हा प्रकार सातत्याने समोर येत आहे.

काय घडले न्यायालयात ?
आजच्या सुनावणीपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला तुमच्या प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल, असे स्पष्ट केले होते. यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवारी सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या, अशी विनंती केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरची तारीख दिल्यानंतर आता पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

तातडीच्या सुनावणीसाठी सिब्बल यांचा आग्रह
कपिल सिब्बल यांनी शक्य तितक्या तातडीच्या सुनावणीसाठी आग्रह धरला. तुम्हाला अंतिम युक्तिवादासाठी किती वेळ लागेल, असा प्रश्न न्यायालयाने सिब्बल यांना विचारल्यानंतर सिब्बल यांनी मी 45 मिनिटांत युक्तिवाद पूर्ण करेन, असे सांगितले. येत्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरची तारीख द्यावी, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी केली. तेव्हा न्यायालयाने ही सुनावणी 12 नोव्हेंबरला होईल, असे सांगितले.

आमदार संजय शिरसाट म्हणाले, न्यायालयाचा निकाल मान्य
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, कायद्यानुसार आमची बाजू भक्कम असून न्यायालय जो काही निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. प्रत्येकवेळी न्यायालयाला आरोपीच्या पिंजर्‍यात ठेवणं ही उबाठा गटाची मानसिकता झाली आहे. निकाल आमच्या विरोधात लागला तर संविधानानुसार, त्यांच्याविरोधात लागला तर संविधानाचा भंग, मग न्यायालयावरती ताशेरे ओढायला ते कमी करणार नाहीत. राज्यघटना मान्य आहे की नाही ते सांगा? जो निकाल लागेल तो मान्य करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.