ज्वेलर्स दुकानातून सोन्याची लगड लांबविणाऱ्या चोरट्यास अटक; पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती –

जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील बालाजी पेठ येथील लक्ष्मीनारायण ज्वेलर्स या सोने कारागिराच्या दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस शनिपेठ पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करून चोरीला गेलेला संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात मोठे यश मिळवले आहे. ही चोरीची घटना घडली होती. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.

अधिक माहिती अशी की, निखिल कैलास गौड (वय ३०, व्यवसाय सोने कारागिरी) यांच्या यांचे लक्ष्मीनाराण ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बिस्वजीत बनेस्वर सासमल (रा. पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) या संशयित आरोपीने ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता ज्वेलर्स दुकानाचे कुलूप तोडून प्रवेश केला. आरोपीने कारागीर सुदर्शन माल यांच्या काम करण्याच्या लाकडी ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यातून १२४ ग्रॅम वजनाचे सोने चोरले. या सोन्याची किंमत सुमारे १३ लाख ९९ हजार रुपये आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी संशयित आरोपीला तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने ४ ऑक्टोबर रोजी हैदराबादला जाण्यासाठी रेल्वे तिकीट बुक केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि संशयित आरोपी बिस्वजीत सासमल याला जळगावातून ताब्यात घेतले. त्याने चौकशीत गुन्हा केल्याचे कबूल केले. न्यायालयाने आरोपीस ७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीकडून १३ लाख ९९ हजार रुपये किमतीचे १२४ ग्रॅम सोने व चोरीसाठी वापरलेली कात्री (कटावणी), लोखंडी पक्कड आणि एक्झाब्लेड ही साधने हस्तगत केली आहेत. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे