“भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंचा अमरावती हाफ मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग: विशेष योगदानासाठी आयोजकांतर्फे गौरव”

भुसावळ (प्रतिनिधी ) –
अमरावती रोड रनर्स व अमरावती मॅरेथॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे २१ किमी, १० किमी, व ५ किमी या वेगवेगळ्या गटांत धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातील २९५०
धावपटूंनी यात सहभाग नोंदविला. यात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ५ महिला व ८ पुरुष अशा एकूण १३ धावपटूंनी सहभाग नोंदविला व आपल्या शहराचे नाव उंचावले.
२१ किमीची स्पर्धा सकाळी ६:०० वाजता, १० किमीची स्पर्धा सकाळी ६:१५ वाजता तर ५ किमीची स्पर्धा सकाळी ६:४० वाजता शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सुरु झाली. यावेळी मुख्य आयोजक दिलीप पाटील, जिल्हाधिकारी तथा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित होते. २१ किमीच्या मुख्य स्पर्धेत ३५० धावपटूंनी सहभाग नोंदविला. शिवाय १० किमी तरुण व ज्येष्ठ नागरिक एकत्रितपणे धावले. ५ किमी स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मॅराथॉनचे वातावरण अधिक जल्लोष पूर्ण केले.
धावणे सुरू झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा अमरावतीकर नागरिकांनी टाळ्या वाजवत तर काही ठिकाणी पुष्पवृष्टी करून धावपटूंचे स्वागत केले. लांबच लांब व रुंद रस्ते धावपटूंच्या गर्दीने फुलून गेले. काही ठिकाणी वाद्यवृंद तर ठिकठिकाणी स्वयंसेवकाच्या प्रोत्साहनामुळे धावपटूचा आनंद द्विगुणित होत होता. याशिवाय रस्त्याच्या एकतर्फी धावण्याची केलेली व्यवस्था, प्रत्येक चौकात योग्य पोलीस बंदोबस्त व वाहतुकीचे योग्य नियमन यामुळे ही मॅरेथॉन अधिक सुरक्षित ठरली . आयोजकांतर्फे व काही स्वयंसेवी संस्थांनी ठिकठिकाणी केलेल्या पेयजल, एनर्जी ड्रिंक, चॉकलेट, केळी आदी खाद्य पदार्थांची केलेली व्यवस्था यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा असूनदेखील धावपटूंना त्यांची धाव उत्साहवर्धक जाणवत होती. शिवाय अमरावतीच्या वाहनधारकांनी केलेले सौजन्यपूर्ण सहकार्य व कौतुक यामुळे देखील ही स्पर्धा स्मरणीय ठरली. ठिकठिकाणी होत असलेले स्वागत व कौतुकाला सामोरे जाऊन जेव्हा धावपटू मैदानावर परतत होते, त्यावेळी प्रत्येक धावपटूस आयोजकांतर्फे पदक प्रदान करण्यात आले.
स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सहभागी धावपटू पुढील प्रमाणे:
२१ किमी: एकता भगत, गणसिंग पाटील, संदीपकुमार वर्मा, प्रदीप सोलंकी, राजेंद्र घाटे, प्रवीण पाटील
१० किमी: माया पवार, जयश्री टिकोटकर, गरिमा न्याती, पुष्पा तिवारी, संजय तिवारी, सुयश न्याती, शशिकांत टिकोटकर.
याप्रसंगी भुसावळ शहरात रनिंगला प्रोत्साहन दिल्याबद्दल व मॅराथॉनमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल आयोजकांतर्फे भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व धावपटूंना व्यासपीठावर बोलावून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.