जळगाव – जगाला शांतीचा संदेश देणारे बुद्ध यांचे समकालीन चीनचे महान तत्त्वज्ञानी लाओत्से यांचे निसर्गप्रधान आणि विज्ञाननिष्ठ विचार हे मानवतेला दिशा देणारे आहेत. या विचारांमुळेच बौद्ध धर्म चीनमध्ये झपाट्याने पसरला. त्यामुळेच आज जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध हवेत, असे प्रतिपादन मा. देशाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
ते नाशिक येथे शासकीय दौऱ्यादरम्यान प्रख्यात लेखक व माजी सनदी अधिकारी मा. बी. जी. वाघ यांच्या “ताओ एक जीवनशैली – जगावे कसे” या पुस्तकाच्या अनौपचारिक प्रकाशन प्रसंगी बोलत होते. हा कार्यक्रम बी. जी. वाघ यांच्या निवासस्थानी पार पडला.
सदर पुस्तकाचे प्रकाशन जळगावच्या प्राईम पब्लिशिंग हाऊसचे श्री. प्रदीप पाटील यांच्या वतीने नुकतेच करण्यात आले असून, देशाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या हस्ते झालेले प्रकाशन ही जळगावकरांसाठी भूषणावह बाब आहे.
या पुस्तकाच्या निर्मितीत कवी शशिकांत हिंगोणेकर यांचेही मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन करताना बी. जी. वाघ यांनी अनौपचारिकरित्या कृतज्ञता व्यक्त केली.

