विद्यार्थ्यांचे शिकणे सुलभ होण्यासाठी अध्ययन समृद्धी व्हायला हवी- केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांचे प्रतिपादन : केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत विविध विषयांवर चर्चा

जळगाव – विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक सुलभ, आनंददायी व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम काटेकोरपणे राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांनी केले.

चिंचोली केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुसुंबे खुर्द पार पडली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत होते. व्यासपीठावर बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, मुकुंदा इंगळे, विलास चौधरी, संजय पाटील, संजय इखे, उषा माळी, अलका पालवे, चित्रलेखा वायकोळे उपस्थित होते. या परिषदेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिक्षणातील नवे प्रयोग, अभ्यासक्रमातील सुधारणा व अध्ययन-अध्यापनातील नव्या तंत्रांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकाभिमुख न राहता प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण देणे महत्त्वाचे असल्याचेही केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनीषा राठोड यांनी केले. तज्ज्ञ मार्गदर्शक मुकुंदा इंगळे यांनी डिजिटल साधनांचा वापर, उपक्रमाधारित अध्ययन-अध्यापन, वाचन-संशोधनाची सवय लावणे तसेच कौशल्याधारित शिक्षण यावर भर द्यायला हवा, असे सांगून शिक्षक हेच अध्ययन समृद्धीचे मूळ घटक असल्याचेही त्यांनी सांगितले.