भुसावळ (प्रतिनिधी ) – माता भगवती ही मूर्तिमंत धर्म, ऊर्जा, स्फूर्ती, ज्ञान, धृती, उत्साह, तेज, धैर्य, शांती यांचे प्रतिक आहे. आपल्या घरामध्ये सुख, शांती, क्षमा, दया पाहिजे असेल तर प्रत्येक व्यक्तीने माता भगवतीची उपासना केले पाहिजे. देवीचे सर्वांगीण वर्णन करणारी देवी भागवत कथा ही ऊर्जा देणारी कथा असल्याचे प्रतिपादन गीतादास हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी येथे केले.

नवरात्रीचे औचित्य साधून भुसावळ येथील हनुमान नगरातील तकदीर मंडळ पंचवटी गृपतर्फे श्रीमद् देवी भागवत कथा महापुराण संगीतमय कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सुरू आहे. कै. गजानन पुंडलिक चौधरी, कै. दिनेश रघुनाथ पाटील, कै. अक्षय दिलीप सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी कथा प्रवक्ते गीतादास हभप चंद्रकांत महाराज साकरीकर हे भाविकांना कथा सांगत आहेत. त्यांना संगीतमय साथ सौ. सुभद्रा चंद्रकांत सपकाळे, कीर्ती चंद्रकांत सपकाळे, डॉ.लक्ष्मीकांत महाजन व बालकलाकार कृष्णा सपकाळे यांची लाभत आहे. आपल्या कथेदरम्यान त्यांनी दूर्गादेवीच्या नऊ अवतारांचे वर्णन केले. ते म्हणाले की, कलियुगामध्ये उन्मत्त झालेल्या अधर्मीय अशा महिषासुररूपी अधर्माला मारून स्वधर्माची पुण्यात्मक घडी देवीने निर्माण केली. त्याचप्रमाणे चंडमुंड या दैत्यांना मारून चामुंडा हे देवीचे नावसुद्धा पडलेले आहेत. श्रीभगवती दूर्गादेवीचे आध्यात्मिक स्वरूप सांगून समाजात मातृत्वाची भावना देवीमुळे निर्माण होत भावना आहे. तसेच प्रत्येक स्त्री ही नवदूर्गा, चंडीका, कालिका, सरस्वती, महालक्ष्मी, माता पार्वतीचे रूप असल्याचेही त्यांनी सांगितले. परिसरातील भाविक संपूर्ण कथा भक्तिभावाने श्रवण करून आत्मिक समाधानाचा लाभ घेत आहेत. समारोपाला गीतादास हभप चंद्रकांत महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
संगीतमय साथीने कथा रंगतदार
गीतादास हभप चंद्रकांत महाराज यांच्या कथा ज्ञानयज्ञात भावपूर्ण गायनाची साथ देणाऱ्या सौ.सुभद्रा चंद्रकांत सपकाळे व कीर्ती चंद्रकांत सपकाळे यांच्या आवाजातली करूणा आणि लयबद्धता तसेच बालकलाकार कृष्णा सपकाळे याच्या निरागस गोड बालस्वरांनी कथा अधिक प्रभावी ठरत आहे. त्याचप्रमाणे डॉ. लक्ष्मीकांत महाजन यांच्या मृदंगाच्या मधुर नादामुळे कथा श्रवणीय होत आहे.

