भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे 10 ते 12 दरम्यान महिला उद्योजक मेळावा : रजनी सावकारे -वस्तू प्रदर्शन विक्रीतून महिला होणार निर्भर : मेळाव्याला भेट देण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदादेखील 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान महिला सक्षमीकरणासाठी तीन दिवस महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन शहरातील ब्राम्हण संघात करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी सावकारे यांनी दिली. या मेळाव्यासाठी प्रायोजक वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे असून त्यांनी मेळाव्यात शहर व तालुक्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहनही केले आहे.

मेळाव्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण
रजनी सावकारे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 13 वर्षापासून महिला सक्षमीकरणासाठी महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे केले जात आहे. यात शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी स्वत: तयार केलेल्या वस्तू, आकाश कंदीलपासून ते डेकोरेशनचे साहित्य, साड्या, घर सजावटीच्या वस्तू, खान्देशी पदार्थ, दिवाळीचे फराळाचे साहित्य या मेळाव्यात ठेवलेले असते. या मेळाव्यात स्टॉल लावणार्‍या महिलांना मोफत स्टॉल लावता येतात. यामुळे गेल्या 13 वर्षांपासून या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असतो. यामुळे महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळत असते. ग्रामीण भागातील महिलांना या माध्यमातून दोन पैसे मिळून त्यांची सुध्दा दिवाळी आनंदात जाते.

विनामूल्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन
शहरातील ब्राह्मण संघात आयोजित 10 ते 12 दरम्यान होणार्‍या या मेळाव्याचे प्रायोजक हे शहराचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आहेत. या मेळाव्यात नागरिकांसह महिलांनी स्वयंस्फूर्तीने भेट द्यावी व मनसोक्त खरेदी करावी, असे आवाहन आयोजक तथा प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केले आहे.