मुंबई (प्रतिनिधी ) – विजय कुमार, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी ११ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना ज्यामध्ये मुंबई विभागातील २, पुणे विभागातील २, सोलापूर विभागातील २, नागपूर विभागातील २ आणि भुसावळ विभागातील ३ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार प्रदान केले. हा कार्यक्रम ०७.१०.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.

या संरक्षा पुरस्कारांचा उद्देश कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यावर असताना दाखविलेल्या सतर्कतेची, अपघात टाळण्यात केलेल्या योगदानाची आणि मागील काही महिन्यांतील रेल्वे संचालनातील सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांची दखल घेणे हा आहे. प्रत्येक पुरस्कारात एक पदक, प्रशस्तिपत्र, उल्लेखनीय सुरक्षा कार्याचा गौरवपत्र आणि रु.२०००/- इतका रोख पुरस्कार समाविष्ट आहे.
पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचा तपशील
मुंबई विभाग
१. श्री सी. एल. कुरिल, मोटरमन, कल्याण, मुंबई विभाग — यांनी १५.०९.२०२५ रोजी आसनगाव उपनगरी गाडी (AN-19) चालवित असताना, ५व्या मार्गासाठी असलेला प्रवेश सिग्नल क्र. VVH-6 चुकीने बंद असल्याचे लक्षात घेतले. त्यांनी सिग्नल न ओलांडता तत्काळ संबंधितांना माहिती दिली आणि योग्य सिग्नल मिळाल्यानंतरच गाडी पुढे नेली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि बारकाईने निरीक्षण केल्यामुळे गाडी चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचली.
२. श्री रवी रंजन कुमार, पॉईंट्समन, कल्याण, मुंबई विभाग — यांनी १५.०८.२०२५ रोजी कल्याण स्थानकावर कर्तव्यावर असताना एका प्रवाशाने धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करताना घसरून पडताना पाहिले. त्यांनी तत्काळ लाल सिग्नल दाखवून गाडी थांबवली आणि प्रवाशाचा जीव वाचवला.
पुणे विभाग
३. श्री प्रेम प्रकाश, लोको पायलट (मालगाडी), मिरज, यांनी १०.०९.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना मसूर आणि शिरवडे स्थानकांच्या दरम्यान अप मार्गावर एक ट्रक उभा असल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तद्नंतर गाडी क्रमांक 17412 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्सप्रेसला खबरदारीचा आदेश देऊन पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच केलेल्या कृतीमुळे संभाव्य अपघात टळला.
४. श्री विजय दिनकर पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक, रेल्वे संरक्षण दल (RPF), मिरज, पुणे विभाग, यांनी ०९.०९.२०२५ रोजी मिरज स्थानकावर सेवेवर असताना, एका प्रवाशाला धावत्या गाडीच्या उलट दिशेने उतरायचा प्रयत्न करताना घसरून पडताना पाहिले. त्यांनी तत्काळ धावत जाऊन प्रवाशाला ओढून सुरक्षित ठिकाणी आणले आणि त्याचा जीव वाचवला.
सोलापूर विभाग
५. श्री प्रताप हिरू, पॉईंट्समन, वाडी, सोलापूर विभाग, यांनी ११.०९.२०२५ रोजी शंटिंग कर्तव्यावर असताना जवळच्या RD4 लाईनवर रेल फ्रॅक्चर असल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि संभाव्य अपघात टाळण्यात मदत केली.
६. श्री भंवरसिंह यादव, ट्रॅक मेंटेनर, पारेवाडी, सोलापूर विभाग, यांनी २८.०७.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना भोपालपेठ पूलाजवळ SEJ टंग रेल तुटलेली असल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ ट्रॅक सुरक्षित केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यावेळी गाडी क्रमांक 22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट आधीच पारेवाडी स्थानकातून निघून गेली होती. त्यांच्या बारकाईच्या निरीक्षणामुळे आणि सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टाळला गेला.
नागपूर विभाग
७. सौ. रमा चौहान, तंत्रज्ञ (C&W), आमला, नागपूर विभाग, यांनी २७.०७.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना मालगाडीच्या रोलिंग इन तपासणीदरम्यान एका वॅगनमधून अनोखी आवाज ऐकला. बारकाईने तपासणी केल्यावर ॲक्सल बॉक्सच्या बेअरिंग कप तुटलेली असल्याचे समोर आले. त्यांच्या बारकाईच्या निरीक्षणामुळे संभाव्य अपघात टाळला गेला.
८. श्री पवन बाचले, सहाय्यक (C&W), आमला, नागपूर विभाग, यांनी १६.०८.२०२५ रोजी रात्रीच्या कर्तव्यावर असताना ४ वॅगनमधून अत्यंत ज्वलनशील पदार्थ लिक होत असल्याचे पाहिले. बारकाईने तपासणी केल्यावर फीलिंग डोमचे झाकण उघडे असल्याचे लक्षात आले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टाळला गेला.
*भुसावळ विभाग*
९. श्री संतोष चौधरी, वरिष्ठ विभागीय अभियंता, बोदवड, भुसावळ विभाग, यांनी २४.०८.२०२५ रोजी वरणगाव यार्डमध्ये सेवेवर असताना धावत्या मालगाडीपासून अनोखा आवाज ऐकला. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. बारकाईने तपासणी केल्यावर ८ टायर्समध्ये धातूचे साचलेले द्रव्य आढळले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टाळला गेला.
१०. श्री रोहित बोरिकर, ट्रॅक मेंटेनर, भुसावळ, भुसावळ विभाग , यांनी १४.०९.२०२५ रोजी स्टॅटिक वार्डमन म्हणून कर्तव्यावर असताना भादली – जळगाव सेक्शनमध्ये. ट्रेन क्र. 22137 नागपूर – अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेसच्या कोचमध्ये ब्रेक बाइंडिंग झाल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि संभाव्य अपघात टाळण्यास मदत केली.
११. श्री श्रीनिवास सिंह, तंत्रज्ञ (C&W), भुसावळ यार्ड, भुसावळ विभाग — यांनी १७.०८.२०२५ रोजी मालगाडीच्या तपासणीदरम्यान एका वॅगनचा बोगी बोल्स्टर तुटलेला पाहिला. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि संभाव्य अपघात टाळण्यात मदत केली.
पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या सतर्कता व कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत, महाव्यवस्थापकांनी सांगितले की अशा प्रकारच्या सतर्कता आणि निष्ठेच्या कृतींमुळे इतर कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि जीवन, मालसामान व रेल्वे मालमत्तेची हानी टाळता येईल.
यावेळी प्रतीक गोस्वामी, अतिरिक्त महाव्यवस्थापक ; श्री चंद्र किशोर प्रसाद, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी, इतर प्रमुख विभागांचे प्रमुख आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

