भुसावळ (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री मंडळाने दिवाळीपूर्वीच नागरिकांना मोठे गिप्ट दिले आहे. मध्य रेल्वेतील भुसावळ विभागातील भुसावळ ते वर्धा या तिसरी-चौथी रेल्वेमार्ग प्रकल्पाला मंगळवारी मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्रातील रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर अधिक बळकट करण्याच्या दिशेने मोठी झेप घेत केंद्रीय मंत्रिमंडळाने भुसावळ-वर्धा तिसरी आणि चौथी रेल्वेमार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-हावडा या देशातील अत्यंत व्यस्त मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. अधिक प्रवासी व मालगाड्यांचे संचालन या नवीन लाईनीमुळे शक्य होणार आहे.
असा होणार रेल्वे मार्ग
भुसावळ – वर्धा हा मार्ग सुमारे 314 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 9.197 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.या मार्गावर 72 रोड ओव्हर/अंडर ब्रिज तसेच एक रेल ओव्हर रेल ब्रिज उभारण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना थेट लाभ होणार आहे. विद्यमान मार्गावरील वाढत्या रेल्वे वाहतुकीमुळे निर्माण होणारा अडथळा कमी होऊन गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा होईल.तसेच पर्यटन आणि स्थानिक रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
पर्यावरणीय दृष्टीनेही हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे. यामुळे दरवर्षी सुमारे 45 कोटी किलो कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होईल.ही घट म्हणजे सुमारे 1.8 कोटी झाडे लावल्यासारखा पर्यावरणीय परिणाम होईल.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क अधिक मजबूत होईल आणि राज्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला नवे बळ मिळेल, असा रेल्वे अधिकार्यांचा विश्वास आहे.
