कोल्डीफ सिरपमुळे आतापर्यंत 19 बालकांचा मृत्यू : बुरशीजन्य पाण्यापासून बनवले सीरप –

नागपूर : कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे आतापर्यंत तब्बल 19 बालकांचा मृत्यू ओढवला आहे तर आजारी पडलेल्या आणखी दोन मुलांचा मंगळवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही बालक नागपूरमधील रुग्णालयात दाखल होते. विशेष म्हणजे हे सिरप जेथे बनवण्यात आले तेथे पाहणीअंती धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुरशीजन्य पाण्यापासून सिरप बनवण्यात आल्याचे उघड झाल्याने आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.

औषध कंपन्या आल्या रडारवर
इंदूरस्थित औषध कंपनी एआरसी फार्मास्युटिकल्स संशयाच्या भोवर्‍यात आली. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार, केंद्र आणि राज्य पथकांनी कंपनीची जोखीम-आधारित तपासणी केली. यावेळी देण्यात आलेल्या 89 पानांच्या अहवालात अनेक धक्कादायक माहिती असून 216 त्रृटींची यादी देण्यात आली. त्यापैकी 23 त्रृटी गंभीर आहेत.

विशेष म्हणजे, बनवण्यात आलेले सीरप हे बुरशीजन्य पाण्यापासून बनवण्यात आले व घाणेरड्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये साठवण्यात आले. कंपनीकडे डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण तपासण्याची प्रक्रिया नव्हती, ज्यामुळे मुलांचा मृत्यू झाला. एआरसीचे सिरप, डीफ्रॉस्ट, देखील छिंदवाडा येथील एका फार्मसीमधून जप्त केले. त्यानंतर, पथकाने 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान कंपनीची तपासणी करत सिरपचे उत्पादन थांबवले.

तपास पथकाला औषध कंपनीत एक घाणेरडा निळा ड्रम सापडला, ज्यामध्ये 50-60 लिटर सिरप सस्पेन्शन होते. गॅस स्टोव्हवर साखरेचा पाक तयार केला जात होता, जो नियमांच्या विरुद्ध आहे.

कफ सिरपमुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रकरण मंगळवारी सुप्रीम कोर्टात पोहोचले. जनहित याचिकेतून सीबीआय चौकशी आणि औषध सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी करण्यात आली.

एखाद्या औषध निर्मिती कारखान्यात 216 दोष आहेत, ज्यापैकी 23 अतिशय गंभीर आणि 150 पेक्षा जास्त गंभीर आहेत. तर दोष दुरुस्त होईपर्यंत कंपनीला औषध तयार करण्याची परवानगी देऊ नये. अशा परिस्थितीत, उत्पादनाच्या गुणवत्तेवर शंकाच असेल जर बुरशीजन्य पाण्याचा वापर होत असेल तर औषध निश्चितच खराब होईल. औषध कंपन्यांनी सरकारने लागू केलेल्या शेड्यूल एमचे काटेकोरपणे पालन करणे खूप महत्वाचे आहे. उत्पादनासोबतच, कंपन्यांनी त्यांच्याकडे येणार्‍या कच्च्या मालाचीही कसून चाचणी केली पाहिजे, तिथेच मोठी चूक होते, असे हरियाणाचे माजी राज्य औषध नियंत्रक नरेंद्र आहुजा म्हणाले.