फेकरी रोडवरील बांधकाम ठिकाणावरून टॅक्टर, ट्रॉलीसह पावणेतीन लाखांचे साहित्य लांबवले –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालु्क्यातील खडका ते फेकरी या रोडच्या बांधकामस्थळावरून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2 लाख 70 हजार रुपयांचा माल लंपास केला. या प्रकरणी भैय्या दशरथ शिंदे (35, रा.पाळधी पोखरी, ता.धरणगाव, जि.जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवार, 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास चोरीची ही घटना घडली. खडका ते फेकरी रोडच्या बांधकाम ठिकाणी ठेवलेले हिरव्या रंगाचे जॉन डिअर ट्रॅक्टर, निळ्या रंगाची ट्रॉली (एम.एच.19 ए.एन.9201) तसेच 10 फूट लांबीचे 56 किलो वजनाचे 6 नग लोखंडी चॅनल असा एकूण दोन लाख 70 हजार 220 रुपयांचा माल चोरीस गेला. ही चोरी अज्ञात चोरट्यांनी बांधकामस्थळी ठेवलेल्या साहित्य व वाहन चोरून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

चोरीची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी हवालदार संदीप बडगे हे अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणातील संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.