भुसावळात भीषण अपघात : भरधाव डंपरने पती-पत्नीला उडवले –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात अपघातांची मालिका कायम असून या अपघातांना कारणीभूत असलेल्या अवजड वाहनांवर कारवाई होणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तहसील कार्यालयासमोरील दोन नंबरच्या पेट्रोल पंपांजवळ मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जळगावकडे भरधाव वेगाने जाणार्‍या एका भरधाव डंपरने दुचाकीला उडवल्याने दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले.

दाम्पत्य गंभीर जखमी
शहरातील महात्मा गांधी पुतळ्याकडून जळगाव रोडने जात असताना हा अपघात झाला. डंपर (एम.एच.19 झेड.5228) च्या धडकेमुळे दुचाकी (एम.एच. 19 डी.वाय 0931) भावना युवराज गाजरे यांच्या डोक्याला तर युवराज गाजरे यांच्या हात आणि पायाला मार लागला. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे गाजरे दाम्पत्य हे दवाखान्यात जात असताना त्यांचा अपघात घडला.

डंपरने दुचाकीला धडक दिल्यावर ती पेट्रोलच्या टँकरजवळ अडकली आणि डंपर तिथेच थांबला त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे यांनी तात्काळ कर्मचार्‍यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी डंपरखाली अडकलेली दुचाकी बाहेर काढली आणि टँकरजवळ अडकलेले डंपर दूर केले. तसेच डंपर ताब्यात घेत ते पोलिस ठाण्यात आणले.

अवजड वाहनांवर धडक कारवाई होणार
शहरातून धावणार्‍या डंपरच्या कागदपत्रांची शहर वाहतूक शाखेतर्फे तपासणी केली जाईल. नियम मोडणार्‍यांसह कागदपत्रे अपूर्ण असल्यास डंपर चालक व मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. डंपर चालकांना वेग मर्यादीत ठेवण्याच्या सूचना देणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे एपीआय उमेश महाले म्हणाले.